नाटळचा कोल्हेवझर धबधबा

नाटळचा कोल्हेवझर धबधबा*

काल सोमवार, १५ जुलै रात्री साडेआठच्या दरम्यान अनिल घरी आला. सोबत तुषारही होता. अनिलने आल्या आल्या सांगितलं, "बंड्या, उद्या आपण तुमची जागा आहे त्या फाटक वाडीच्या धबधब्यावर जायचे."

मी विचारले,

"वाट दाखवुक कोण हा"

"तळेवाडीतलो प्रशांत आणि पांडू हा." अनिलने सांगितले.

सकाळी 6 वाजता निघायचे ठरले. गावात अशी अनेक सृष्टीसौन्दर्यची स्थळे आहेत. ही ठिकाणे शोधून ग्रामस्थ व इतर पर्यटकांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. गेल्या वर्षी *रॉयल धबधब्याची* ओळख करून दिली ह्यावर्षी *कोल्हेवझर*.

फाटक वाडीत जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक मोगरण्याकडून आणि एक शिंगभाटल्याकडून. मोगरण्याकडची वाट पावसाळ्यात अडचणीची असते. अनेक वेलींनी रान भरलेले असते. त्यामुळे शिंगभाटले जवळच्या वाटेने जायचे आमचे ठरले.

सकाळी ५.४५ च्या अलार्मने जाग आली. रेनकोट-छत्री घेऊन तयार झालो. आणि तुषार आला. ६ वाजता निघालो. १५ मिनिटात आजूबाजूला भाताची लावणी झालेले कोपरे पहात अनिलकडे पोहचलो. नजरेच्या टोकापर्यंत हिरवे-पोपटी रंगाचे गालिचे डोळ्यांना थंडगारपणा आणत होते. कोकणाचे हेच वैशिष्ट्य आहे की, कोकण सर्व ऋतूत वेगवेगळे दिसते. प्रत्येक ऋतूची एक वेगळीच मजा आहे.

स्वप्नील मराठेच्या घराच्या बाजूने एक रस्ता वर जातो. तो रस्ता घेऊन, थोडे वर गेल्यानंतर डाव्या बाजूच्या पायवाटेने आमदारांच्या रस्त्यावर आलो, त्या रस्त्याने आम्ही माळावर आलो. ही माळावरची पायवाट अनिलच्या वाड्याकडे जाते. घरापासून लांब असलेल्या शेतावर गुरांसाठी जो गोठा बांधला जातो त्याला तळकोकणात "वाडा" म्हणतात. या वाड्यात शेती अवजारे आणि जेवण करण्यासाठी चूलदेखील असते.

समोर आम्हाला धाकटे मोहूळ आणि थोरले मोहूळ विभागणारी पाज दिसत होती (डोंगराचा कणा) ह्या पाजेत जर रस्ता केला तर धाकटे आणि थोरले मोहूळ फार जवळ येईल. अनिलच्या वाड्याकडे आलो आणि सह्याद्री, कुरले व्हकाल डाव्या हाताला ठेवून आम्ही दिशा बदलून कोल्हे-वजाराच्या दिशेने निघालो. वजर = ओझर = धबधबा. ५-७ मिनिटे चाललो आणि वरतून आलेला एक व्हाळ (पाण्याचा ओहोळ) समोर आला. आम्ही पुन्हा दिशा बदलून त्या व्हाळाला डाव्या हाताला ठेवून त्यासोबत खाली चालू लागलो. व्हाळाच्या पाण्याचा आवाज आता वाढू लागला. मला जाणीव झाली की आपण धबधब्याच्या जवळ आलो. दाट वाढलेल्या झाडीतून प्रशांतने धबधब्याचा कोसळ दाखविला. वाव, काय ते सुंदर दृश्य होते. अनिल बोलला, "इथे रेलिंग करूया. आणि झाडी काढुया, हयसून धबधबो चांगलो दिसात." आयडिया चांगली होती. आपल्या गावाबद्दल अभिमान, अस्मिता असली की असे विचार व्यक्त होतात.

अजून खालच्या अंगाला गेलो आणि तेथून पाण्यात उतरून वरच्या दिशेने आम्ही निघालो. २-४ मिनिटात धबधबा दिसायला लागला. आमचे मोबाईल बाहेर आले आणि फोटोसेशन सुरू झाले. कॅमेराचा शटर स्पीड कमी करून धबधब्याचे काही फोटो काढले. पाण्याचे तुषार एकमेकात मिसळल्याने पांढऱ्या शुभ्र दुधासारखा फोटो आला. मोठे दगड आणि खडकावर सावध चालत आम्ही धबधब्याच्या अधिक जवळ गेलो. ह्या धबधब्याचे नाव कोल्हे ओझर. कोल्हे ओझर च्या आजूबाजूस पाण्याचे अनेक उमाळे वाहत होते. कोकणात पडणारा ३५०० mm पाऊस जमिनीत मुरून उभ्या जमिनीतून हे पाण्याचे उमाळे पुन्हा जमिनीवर पडत होते. धबधब्याचे पाणी किमान ३० फुटांवरून पडते. रुंदी अंदाजे २० फुटांची आहे. स्वप्नील मराठे यांच्या घराकडून केवळ अर्ध्या तासाच्या अंतरावर हा कोल्हेवझर धबधबा आहे.

आपणास येथे जावयाचे असेल तर प्रशांत सावंत- 09421144545, तळेवाडी, नाटळ यांना संपर्क करावा. अगोदर फोन केला तर आपणास शाकाहारी/मांसाहारी जेवण, नाश्ता मिळेल. काळ्या वाटण्याची उसळ, आंबोळी, घावणे, चपाती, चटणी, भाकरी, कोंबडी-वडे, खेकडे, पोहे, उपमा, पिठलं- भाकरी, जवळा-भाकरी, चहा वगैरे.

*नक्की या, नाटळचा कोल्हेवझर धबधबा तुमची वाट पहात आहे.*

-विश्वनाथ म. सावंत, 

9769264430

अध्यक्ष - ग्राम विकास मंडळ, नाटळ